
अहमदनगर- येथील बेकरी व्यावसायिक मोहनीश किशन कराचीवाला (वय 43 रा.कराचीवाला बेकरी, सर्जेपुरा) यांची पाच लाख 80 हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. बेकरीसाठी लागणारी क्रिमरोल पॅकींग, चिक्की पॅकिंग, टोस्ट पॅकींग मशिन बनविण्यासाठी दिलेली पाच लाख 80 हजार रूपये घेऊन साहित्य न देता त्यांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून उल्हासनगरच्या कंपनी चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कराचीवाला यांचे सर्जेपुरा येथे कराचीवाला बेकर्स नावाने दुकान आहे. या दुकानात क्रिमरोल पॅकींग, चिक्की पॅकिंग व टोस्ट पॅकींग मशिन घेण्यासाठी त्यांनी उल्हारसनगर येथील ग्रेस इंजिनिअरींगचे अजय सोरे यांना ऑर्डर दिली होती.
या मशिनसाठी त्यांनी वेळोवेळी सोरे यांना पैसे पाठवले. एकूण पाच लाख 80 हजार रूपये त्यांनी जानेवारी 2021 ते 16 डिसेंबर 2021 पर्यंत पाठविले होते. मात्र त्यानंतर 10 महिने झाले तरी सोरे यांनी सदरील मशिनचा पुरवठा कराचीवाला यांना केला नाही.
तसेच पाठविलेले पाच लाख 80 हजारांची रक्कमही परत न करता कराचीवाला यांची फसवणूक केली. त्यामुळे मोहनीश कराचीवाला यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अजय सोरे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.