
अहमदनगर- अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एकाला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी मोरे यांनी दोषी धरून 20 वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली. सतीश बन्सी उमाप (वय 35 रा. राहुलनगर, ता. पारनेर) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीची साक्ष, डी. एन. ए. पुरावा महत्वाचा ठरला. विशेष सरकारी वकील अॅड. केळगंद्रे-शिंदे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तीवाद ग्राह्य धरण्यात आला. पारनेर पोलरस ठाण्याचे हवालदार शिवनाथ बडे यांनी सहकार्य केले.
घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी 12 सप्टेंबर 2018 रोजी एका धार्मिक उत्वासानिमित्त सतीश बन्सी उमाप याच्या घरी गेली होती. सतीश याने तिला चाकू दाखवून धमकावले. त्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला. या घटनेचे त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रिकरण केले. सदरचे व्हिडीओ चित्रिकरण पीडित मुलीला दाखवले. जर कोणाला काही सांगितले तर हे व्हिडीओ चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
मुलगी गरोदर राहिली असल्याचे आईच्या लक्षात आले. आईने विश्वासात घेऊन माहिती विचारली. त्यानंतर मुलीने 14 एप्रिल 2019 रोजी पारनेर पोलीस ठाण्यात सतीश बन्सी उमाप याच्याविरूध्द फिर्याद दिली. त्याच्याविरूध्द भा.दं.वि. 376, 376 (2)(एन), 376 (3) आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्यवये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तपास करून न्यायालयामध्ये सतीश उमाप विरूध्द दोषारोपत्र दाखल केले. पीडित मुलीस गर्भवती होऊन बराच कालावधी झालेला होता. त्यामुळे गर्भपात करणे शक्य नव्हते. तिचे सिझेरीयन करून बाळंतपण करण्यात आले.