
अहमदनगर- कोतवाली पोलिसांनी कारवाई करून नगर शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या केडगाव शाखेतून जप्त केलेले बनावट सोन्याच्या दागिन्यांवर नगर शहरातील एका प्रतिष्ठित व मोठ्या सराफ दुकानाच्या नावाचा शिक्का असल्याची माहिती आरोपींच्या तपासातून समोर आली आहे.
फसवणूक करण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी तसेच सोने खरे आहे, असे भासवण्यासाठी या दुकानाचा शिक्का मारला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नगर शहर सहकारी बँक आणि संत नागेबाबा सोसायटीमध्ये सोन्याचे बनावट दागिने आढळून आले आहेत. याव्दारे फसवणूक झाली आहे. सध्या अटकेत असलेल्या आरोपींकडून अनेक खुलासे समोर येत आहेत.
या प्रकरणाशी संबंधित आणखी काहींची चौकशीही पोलिसांनी सुरू केली आहे. त्यासाठी दोघांना ताब्यातही घेण्यात आले आहे. मात्र, बनावट दागिन्यांची तपासणी सुरू असताना यातील बहुतांशी दागिन्यांवर नगर शहरातील एका प्रतिष्ठित व मोठ्या सराफ दुकानाच्या नावाचा शिक्का मारल्याचे समोर आले आहे. बनावट दागिन्यावर हॉलमार्किंग करून व या दुकानाच्या नावाचा शिक्का मारून सदरचे दागिने खरेच आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला, असे तपासात समोर आले आहे.