
अहमदनगर- दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आज शुक्रवार सकाळी श्रीरामपूर परिसरातील नेवासा रोडवरील हॉटेल गझल समोर हा भीषण अपघात झाला.
अपघातात राजेंद्र मारूती बोरुडे (वय 52 रा. श्रीरामपूर) यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना नागरिकांनी तात्काळ औषध उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात हलविले. परंतू वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
एका दुचाकीवर असलेले बोरुडे यांचा व कोपरगाव तालुक्यातील धोत्रे भोजडे येथील गणेश भाऊसाहेब पिंपळे व यांच्यासोबत असलेल्या यमुनाबाई पुंजाहारी मुळे (रा. नेवासा रोड, नाक्यासमोर, श्रीरामपूर) यांच्यात हा अपघात झाला.
राजेंद्र मारुती बोरुडे यांच्याकडे दुचाकी क्र. एम. एच. 17 सीके 8105 या क्रमांकाचे तर जखमी गणेश भाऊसाहेब पिंपळे यांच्याकडे दुचाकी क्र. एम. एच. 17 सीके 7717 या क्रमांकाचे दुचाकी वाहन होते. अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. अपघातात गणेश भाऊसाहेब पिंपळे (वय 35) व यमुनाबाई पुंजाहारी मुळे (वय 65) हे जखमी झाले असून यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती नागरिकांनी शहर पोलीस ठाणे यांना कळविली. त्यावरून पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक अमोल गायकवाड, पोलिस नाईक किरण पवार, यांनी घटनास्थळी भेट देत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त व्यक्तींना नागरिकांच्या मदतीने येथील साखर कामगार रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती. या परिसरात वारंवार अपघात होत असल्याने येथे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.