
अहमदनगर- दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी अहमदनगर शहरातील लॉजची तपासणी केली. यावेळी लॉज भाड्याने देताना प्रवाशांकडून ओळखपत्र न घेता त्यांना लॉजमध्ये प्रवेश दिला असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी चाणक्य चौकातील लॉज चालकाविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार चंद्रकांत भानुदास खेडकर यांच्या फिर्यादीवरून हॉटेल चाणक्य लॉजिंगचा मॅनेजर बादशहा उस्मानभाई सय्यद (वय 43 रा. वाटेफळ, ता. नगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने दहशतवादी विरोधी पथकाकडून खबरदारी घेण्यात येत आहेत. लोकांना लॉजमध्ये प्रवेश देताना त्यांच्याकडून ओळखपत्र घेण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या आदेशान्वये शुक्रवारी पोना. महादेव गरड आणि पोकॉ. अमोल शंकर कांबळे यांच्या पथकाने लॉजिंगची तपासणी केली असता चाणक्य लॉजमध्ये प्रवाशांकडून ओळखपत्र न घेता त्यांना लॉजमध्ये प्रवेश दिला असल्याचे तपासणीतून समोर आले आहे. म्हणून लॉज चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.