
अहमदनगर- जमिनीच्या वादातून तिघांवर तलवार,गज,काठ्याने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रवींद्र कानिफनाथ भगत (वय-27), कानिफनाथ मारुती भगत (वय 45), मीनाबाई कानिफनाथ भगत (वय 40, रा. बाबुर्डि घुमट, ता. नगर) अशी जखमींची नावे आहेत.
जखमी रवींद्र भगत यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग शंकर बोरुडे, आदेश पांडुरंग बोरुडे, सुशांत पांडुरंग बोरुडे, सिंधुबाई पांडुरंग बोरुडे व इतर दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी बाबुर्डी घुमट शिवारात ही घटना घडली. पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी व आरोपी यांचा यापूर्वी 2007 मधे बाबुडी घुमट गावामधे गट क्रमांक 287 मधील जमिनीचा व्यवहार झाला असून सदर जमिनीच्या वादावरून न्यायालयाने फिर्यादी यांचे बाजूने निकाल दिला आहे. तसेच आरोपींना मनाई हुकूम दिला होता, सदर जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात सुरू आहे.
त्याचा राग मनात धरून वर नमुद आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांचे शेतात जाऊन वरील जखमी फिर्यादी, फिर्यादी ची आई व वडील याना तलवार, गज, काठ्यांनी डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे.