
अहमदनगर- श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यातील तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी या संबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या मुलींचा शोध घेत आहेत. या घटनांनी पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीरामपूर शहरातून एक तर राहाता तालुक्यातील जळगाव येथून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे.
श्रीरामपूर शहरातील बोरावके कॉलेज जवळून साडे सतरा वर्षांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने शहर पोलिसात दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार श्री. हापसे तपास करीत आहेत.
जळगाव (ता. राहाता) येथील आईच्या फिर्यादीवरून साडे सतरा वर्षांच्या मुलीला सकाळी 10.30 वा. अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा गुन्हा तालुका पोलिसांत दाखल झाला आहे.
तसेच जळगाव येथूनच दुपारी 1 वाजता साडे सोळा वर्षांच्या मुलीला एका तरुणाने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलिसांत दिली आहे. पोलीस निरीक्षक श्री. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. निकम अधिक तपास करीत आहेत.