
अहमदनगर- ओढ्यात अंदाजे 35 वर्ष वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने देवळाली प्रवरा (ता. राहुरी) परिसरात खळबळ उडाली आहे. शेटेवाडी येथील खांदे-वाळूंज वस्ती जवळील नाग ओढ्यात तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे.
अंगात पांढर्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट, डोक्याचे केस वाढलेले, कंबरेला लाल रंगाचा करदोरा आहे. गळ्यात पंचरंगी धागा अशा वर्णनाचा सदर तरुण आहे. गेल्या चार-पाच दिवसा पासून परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने ओढ्या-नाल्यांना पूर आला असून ओढे-नाले तुडूंब भरून वाहत आहेत.
शुक्रवारी दुपारी नाग ओढ्यात हा अज्ञात पुरुषचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत माजी उपनगराध्यक्ष कारभारी वाळुंज, शरद खांदे यांना दिसून आला. त्यांनी याबाबत तातडीने राहुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली.
माहिती मिळताच घटनास्थळी देवळाली प्रवरा आऊट पोस्टचे पोलीस भिताडे,रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे, सामाजिक कार्यकर्ते मयूर कदम यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राहुरी येथे रवाना केला.
याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार प्रभाकर शिरसाठ करीत आहेत. या बाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.