
अहमदनगर- जमीन व्यवहारातील पैसे न दिल्याने तिघांनी एका तरूणाचे अपहरण केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. 25 हजार रूपये न दिल्याने रौनक सुभाष चुडीवाल (वय 33 रा. धरतीचौक) या तरूणाचे अपहरण झालेल्याने कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सुभाष चुनिलाल चुडीवाल (वय 70) यांनी फिर्याद दिली आहे. मंगलसिंग संतोषसिंग धारीवाल (रा. वडारवाडी, भिंगार), सनी शंकर निकाळजे (रा. गौतमनगर, भिंंगार नाका, भिंगार) व अभि शंकर वाघेला (रा. नेहरू कॉलनी, भिंगार) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
रौनक याने मंगलसिंग धारीवाल यांचे आईचे भाऊ देवराम भागाजी गायकवाड (रा. पिंपळगाव वाघा ता. नगर) यांची नऊ एकर जमीन विकत घेतली होती. त्या जमिनीचे पैसे भाव हिश्याप्रमाणे दिले होते. रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास धारीवाल, निकाळजे, वाघेला हे रौनक यांच्या घरी गेले.
त्यातील धारीवाल फिर्यादीला म्हणाली,‘तुमचा मुलगा रौनक याने पिंपळगाव वाघा येथील नऊ एकर जमीन विकत घेतली असून त्याचे भाव हिश्याप्रमाणे आमचे 25 हजार रूपये देणे बाकी आहे, ते आम्हाला आजपर्यंत दिले नाहीत. तुम्ही जो पर्यंत जमिनीचे व्यवहाराचे पैसे देत नाही, तो पर्यंत आम्ही तुमचा मुलगा रौनक यास बरोबर घेऊन जात आहोत’, असे म्हणून रौनक यास बरोबर घेऊन जात असताना फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ दमदाटी करून रौनक यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुचाकीवरून घेऊन गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.