अहमदनगर- घरात घुसून एका अल्पवयीन मुलीच्या आजी-आजोबांसह आईला मारहाण करीत दमदाटी करुन सदर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील एका गावात घडली.
दरम्यान अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने पकडले असून मुलीची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
शुक्रवारी 23 सप्टेंबर रोजी पठारावरील एका गावात राहणार्या एका अल्पवयीन मुलीला अमोल बापू खेमनर या तरुणाने पळवून नेल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यासाठी शुक्रवारी दुपारी एक वाजण्याचा सुमारास त्याने आपले आई-वडील सिंधुबाई व बापू रंभा खेमनर यांच्यासह संदेश चिलाप्पा खेमनर, मंगेश धोंडीभाऊ शेंडगे (सर्व रा. साकूर) व पोपट शेरमाळे (रा. समनापूर) यांना सोबत घेवून कट रचला होता. त्यानुसार ठरल्या दिवशी हे सर्वजण चारचाकी वाहनातून फिर्यादीच्या घरी गेले.
यावेळी या सर्वांनी अल्पवयीन मुलीचे वृद्ध आजी व आजोबा यांना मारहाण करीत दमबाजी केली. आमच्या नादाला लागायचे नाही, नाहीतर एकेकाला संपवून टाकू अशी धमकी देत त्यांनी घरात असलेल्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने सोबत आणलेल्या चार चाकी वाहनात बसवून तेथून पलायन केले.
या घटनेने घाबरलेल्या या कुटुंबाने याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या प्रकरणी वरील सहा जणांविरोधात कट रचण्याचे कलम 120 (ब) सह 363, 366, 141, 143, 147, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना समजल्यानंतर त्यांनीही तत्काळ घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या सूचनेवरुन अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा, श्रीरामपूर सायबर सेल यांच्या सहकार्याने संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी तातडीने पथक नियुक्त करुन तपासाच्या दृष्टीने रवाना केले.
त्यानुसार पथकाने मुलीचा शोध सुरु केला. दरम्यान आरोपी अपहृत मुलीसह श्रीगोंदा, दौंड, पाटस, बारामती व भिगवण या भागात वारंवार ठिकाणं बदलत असल्याचे तपास पथकांच्या लक्षात आले. मात्र संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने आरोपींचा नेमका माग काढीत दिशा पकडली आणि थेट श्रीगोंदा गाठले. या दरम्यान आरोपींनी अनेकदा पोलिसांना हुलकावणीही दिली, मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला. अखेर संगमनेरच्या पथकाने जवळपास साडेतीन किलोमीटर पाठलाग करीत संशयीत असलेली मारुती ब्रीझ्झा क्र. एम. एच.14, एफ.एस 6589 अडविली.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यात अपहृत मुलगी आढळून येताच वाहनातील सर्व सहाही जणांना ताब्यात घेण्यात आले. त्या सर्वांना संगमनेरात आणून त्यांना घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पळवून नेणार्यांच्या तावडीतून सुटका केलेल्या अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. अवघ्या 36 तासांतच या प्रकरणाचा उलगडा करुन अपहृत मुलीची सुखरुप सुटका करण्यासह सहा आरोपींना अपहरणासाठी वापरलेल्या वाहनासह पकडणार्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकात पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस शिपाई अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, श्रीरामपूर सायबर सेलचे पोलीस नाईक फुरकान शेख, पोलीस शिपाई प्रमोद जाधव, आकाश बहिरट व घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष खैरे, गणेश लोंढे, पोलीस शिपाई हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, नामदेव बिरे यांचा समावेश होता.