अहमदनगर- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेचे नगर कनेक्शन समोर आले आहे. या इस्लामी संघटनेत कार्यरत असलेल्या नगर जिल्ह्यातील दोघांना केंद्रीय तपास यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी आज पहाटे तीन वाजता ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नगर व संगमनेर येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईत नगर शहरातून संघटनेशी निगडित असलेला विभागीय अध्यक्ष आणि संगमनेरमधून संघटनेवर सदस्य असलेला एका मौलानाला ताब्यात घेण्यात आले. या दोघांनाही स्थानिक पोलिसांनी ठाण्यात आणले होते. दोघांविरुद्ध १५१(३) नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय. या कारवाई संदर्भात वरिष्ठ पातळीवर गुप्तता पाळली गेली होती.
‘पीएफआय’ या इस्लामी संघटनेविरोधात देशभर कारवाई सुरू आहे. राज्यात पुणे, बीड, अमरावती, औरंगाबाद, नाशिक अशा जिल्ह्यात पीएफआय संघटनेच्या कार्यालयांवर आणि निगडित असलेल्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेने छापे टाकून अटक केली आहे.
नगर जिल्ह्यात या संघटनेची निगडित असलेल्यांवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई नव्हती. परंतु आता ही कारवाई झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.