अहमदनगर- महिलेच्या पोटात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन खून करुन ती ओट्यावरुन पडून मृत्यूमुखी पडल्याचा बनाव केल्याची घटना नेवासा तालुक्यातील भेंडा येथे घडली.
दरम्यान याबाबत डॉक्टरांच्या अभिप्रायावरुन नेवासा पोलीस ठाण्यात चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाऊसाहेब धोंडीराम सावंत, निलेश भाऊसाहेब सावंत, चंद्रकला आत्माराम चोपडे (तिघेही रा. भेंडा) व शहाबाई सोपान चोपडे (रा. चिलेखनवाडी ता. नेवासा) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, पद्माबाई भाऊसाहेब सावंत (वय 46) रा. भेंडा ता. नेवासा या महिलेचा ती घराच्या ओट्यावरुन पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव वरील आरोपींनी केला होता. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मृत्यूबाबत चौकशीची कागदपत्रे, शवविच्छेदन अहवाल, त्यात डॉक्टरांनी दिलेला अभिप्राय यातून मयत पद्माबाई भाऊसाहेब सावंत हिचा मृत्यू उंचावरुन खाली जमिनीवर पडून जखमी होवून झालेला नाही. तर तिच्या पोटात हाताने, बुक्क्याने, लाथांनी तसेच लाकडी दांडके किंवा लोखंडी रॉडने पोटात मारुन पोटातील आतडे फाटल्याने मृत्यू झाला आहे.
तसेच संगनमत करुन 21 सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अज्ञात कारणासाठी तिच्या खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मयत ओट्यावरुन पडून जखमी झाल्याची खोटी माहिती वैद्यकीय अधिकार्यांना दिली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी चौघा आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 302, 201, 176, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.