अहमदनगर- भिंगार येथील विनायक संजय सदलापूरकर (वय 17 रा. भिंगार) हा युवक मित्रांसोबत पोहण्यासाठी विळद (ता. नगर) शिवारातील फॉरेस्टमधील धबधब्याच्या ठिकाणी गेला होता. त्याचा पाय घसरून तो दरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आज बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भिंगार येथील विनायक सदलापूरकर हा त्याच्या सहा मित्रांसोबत बुधवारी विळद शिवारातील धबधब्याच्या ठिकाणी पोहण्यासाठी गेला होता. सदर ठिकाणी त्याचा पाय घसरून तो खोल दरीत पडला. त्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. विनायकचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला होता. अधिक तपास पोलीस करीत आहेत.