अहमदनगर- विजेचा धक्का लागून 39 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील तरवडी येथे रविवारी दुपारी घडली. नंदकुमार देवराव नाईक असं मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत जनार्धन विठ्ठल क्षीरसागर (वय 55) रा. तरवडी ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यात म्हटले की, 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेचे सुमारास मी कुकाणा येथून माझे कामकाम पूर्ण करून तरवडीकडे येत असताना नाईकवाडी तरवडी येथून जात होतो.
त्यावेळी मला नंदकुमार देवराव नाईक यांचे घरासमोर लोकांची गर्दी दिसल्याने मी तेथे जाऊन पाहिले असता, तेथे मला नंदकुमार देवराव नाईक हा बेशुद्ध अवस्थेत खाली पडलेला दिसला. त्यावेळी आजुबाजुच्या लोकांनी विजेचा धक्का लागल्याचे सांगितल्याने आम्ही त्यास खाजगी वाहनातून कुकाणा येथे खासगी हॉस्पिटल येथे आणले.
तेथील डॉक्टरानी नेवासा फाटा येथे घेऊन जाण्यास सांगितल्याने आम्ही नंदकुमार देवराव नाईक यास कुकाणा येथून रुग्णवाहिकेने नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले.
या खबरीवरून नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टरला 118/2022 सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद केली असून पोलीस नाईक श्री. गडाख पुढील तपास करीत आहेत.