
अहमदनगर- कंटेनरच्या चाकाखाली चिरडून ड्रायव्हर जागीच ठार झाला. शिवबली अमरनाथ यादव (वय 62, रा. मिर्झापुर, उत्तर प्रदेश) असे मयत चालकाचे नाव आहे.
संगमनेर ते कोपरगाव रस्त्यावर तळेगाव दिघे गावा दरम्यान शनिवारी पहाटे 6.20 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शिवबली अमरनाथ यादव हा ड्रायव्हर त्याच्या ताब्यातील कंटेनर (क्र. एमएच 04 एफडी 7760) घेऊन संगमनेर कडून कोपरगावच्या दिशेने जात होता. दरम्यान तो कंटेनर घेऊन तळेगाव दिघे चौफुली दरम्यान आला असता लोणीकडून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरची व शिवबली यादव यांच्या ताब्यातील असलेल्या कंटेनरची धडक होत किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही चालकांमध्ये नुकसान भरपाई वरून वादावादी झाली.
दरम्यान लोणी कडून आलेल्या व अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाने कंटेनर नाशिक ऐवजी संगमनेरच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास थांबविण्यासाठी शिवबली यादव हा ड्रायव्हर सदर कंटेनरच्या केबिनच्या दरवाजाला लटकला. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर अपघातास कारणीभूत कंटेनर चालकाने शिवबली यादव यास ढकलून दिले, त्यामुळे शिवबली यादव हा कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला.
या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी डमाळे, बीट अंमलदार नितीन शिंदे, पोलीस नाईक बाबा खेडकर, यमना जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी हलविला. अपघातास कारणीभूत चालक कंटेनर घेऊन पसार झाला. दरम्यान या घटनेनंतर तळेगाव दिघे चौफुली परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
याप्रकरणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या खबरीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे.