
अहमदनगर- संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने दहशतवादी विरोधी पथकाकडून खबरदारी घेण्यात येत आहेत. लोकांना लॉजमध्ये प्रवेश देताना त्यांच्याकडून ओळखपत्र घेण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत.
दहशतवाद विरोधी पथकाने नगर शहरातील लॉजची तपासणी केली असता लॉज भाड्याने देताना प्रवाशांकडून ओळखपत्र न घेता त्यांना लॉजमध्ये प्रवेश दिला असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी माळीवाडा परिसरातील दोन लॉज चालकांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या आदेशान्वये शनिवारी पोलीस अंमलदार पठाण, अमोल कांबळे, सचिन भिंगारदिवे, चंद्रकांत खेडकर यांच्या पथकाने माळीवाडा परिसरातील लॉजिंगची तपासणी केली असता पुनम व भारत भुवन या दोन लॉजमध्ये प्रवाशांकडून ओळखपत्र न घेता त्यांना लॉजमध्ये प्रवेश दिला असल्याचे तपासणीतून समोर आले आहे. म्हणून लॉज चालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सहाय्यक फौजदार मियाँ पापाभाई पठाण यांच्या फिर्यादीवरून पुनम लॉजिंगचा चालक मोहनसिंग हरनामसिंग वधवा (वय 74 रा. आनंदधाम, नगर) याच्याविरूध्द व पोलीस शिपाई अमोल कांबळे यांच्या फिर्यादीवरून भारत भुवन लॉजिंगचा चालक पुष्करलाल रामेश्वरलाल साल्वी (वय 24 रा. राजस्थान) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.