
अहमदनगर- बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्याच्या प्रकरणात येथील उप विभागीय दंडाधिकारी कार्यालयाची फसवणूक झाली आहे. येथील आर्मी स्टेशन हेडकॉर्टर यांच्या नावाने बनावट सहीचे व शिक्क्यांची तीन ना हरकत पत्रे सादर करून अज्ञात व्यक्तीने ही फसवणूक केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्राधिकृत केलेले महसूल सहाय्यक संजय किसन गोलेकर (रा. खर्डा ता. जामखेड) यांनी फिर्याद दिली आहे.
सुरूवातीला या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी उप विभागीय अधिकारी कार्यालयास पत्र पाठवून माहिती दिली होती. भिंगार येथील स.नं 4/8 ब पैकी मधील प्लॉट नंबर 7 मधील 123.75 चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम परवानगी संदर्भात अर्जदार बबन भागचंद बेरड (रा. भिंगार ता. नगर) यांच्या अर्जाच्या अनुषंगाने येथील आर्मी स्टेशन हेडकॉर्टरने कोणत्याही प्रकारचे बांधकामासाठी ना हरकत पत्र दिले नसल्याचे व संबधीत इसमा विरूध्द पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याबाबत कळविले होते.
बांधकामाच्या परवानगी संदर्भात स्टेशन हेडकॉर्टर, अहमदनगर यांचे बनावट पत्र वापरल्याचे निदर्शनास आले होते. भिंगार पोलिसांनी याबाबतचा अहवाल सादर करून घेतला होता. सदर फसवणुकीचा प्रकार हा कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत घडलेला असल्याने या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणे बाबत कळविण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कोतवाली पोलीस ठाण्याकडूनही आमीर तकी मिर्झा (रा. मुकुंदनगर) यांनी दिलेल्या तक्रार अर्ज अनुषंगाने बांधकाम परवानगीबाबत उप विभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून विचारणा करण्यात आली होती. अमीर तकी मिर्झा यांनी नागरदेवळे (ता. नगर) हद्दीतील स.नं. 92/1 मधील प्लॉट नंबर 45 मध्ये बांधकाम परवानगीसाठी बिल्डरने कोठुनतरी आर्मी हेडकॉर्टरची बनावट पत्र घेऊन बांधकाम परवानगी घेतल्याबाबतचा अर्ज दिला होता.
याबाबत आर्मी स्टेशन हेडकॉर्टरकडे विचारणा केली असता 26 सप्टेंबर, 2022 रोजीच्या पत्रान्वये अमीर तकी मिर्झा प्रकरणात पत्र दिले नसल्याबाबत कळविले. त्यामुळे बांधकाम परवानगी कामी वापरण्यात आलेले पत्र बनावट असले बाबत निष्पन्न झाले. तसेच भिंगार (ता. नगर) सर्वे नं. 10, 11 व 12 या जमिनीस पब्लीक युटिलीटी या विभागातून वगळुन रहिवास विभागात समाविष्ठ करण्याबाबत निलेश प्रेमराज पोखर्णा व इतर पाच जणांनी अर्ज केलेला होता. त्यानुसार उप विभागीय कार्यालयामार्फत आर्मी स्टेशन हेडकॉर्टरला त्यांचा नाहरकत दाखला मिळण्याबाबत पत्र देण्यात आले होते.
आर्मी स्टेशन हेडकॉर्टर यांच्या नावाने दोन पत्र टपालाने प्राप्त झाली. 23 ऑक्टोबर, 2020 रोजीच्या पत्रान्वये प्रस्ताव अमान्य करण्यात आला. परंतु 5 नोव्हेंबर, 2020 च्या पत्रानुसार प्रस्ताव मंजुर करण्याबाबत आर्मी विभागाने कळविले. मात्र सदरचे पत्र बनवाट असल्याचे सकृतदर्शनी दिसून आले. त्यामुळे अज्ञात इसमाने आर्मी स्टेशन हेडकॉर्टरच्या नावाने तीनही बनावट सहीचे व शिक्क्यांचे पत्रे सादर करून उप विभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी कार्यालयाची फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे करीत आहेत.