अहमदनगर- आठवडा भरापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह धामणगाव आवारीच्या (ता. अकोले) शिवारात आज सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रतिकेश माधव चौधरी (वय 21 रा. धामणगाव पाट ता. अकोले) असं या युवकाच नाव आहे.
दरम्यान त्याचा घातपात झाल्याचा संशय कुटुंबीय व नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान अकोले पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
प्रतिकेश माधव चौधरी हा 20 सप्टेंबर रोजी सकाळी घरातून मजुरी काम करण्यासाठी गेला होता. तो पुन्हा घरी आलाच नाही, नातेवाईकांनी त्याचा शोधही घेतला मात्र प्रतिकेश मिळून न आल्याने अकोले पोलीस ठाण्यात तो गायब असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.
बुधवारी आठवडाभरानंतर धामणगाव आवारी गावातील सार्वजनिक शौचालय जवळील मकाच्या शेतात प्रतिकेश याचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रतिकेशचे नातेवाईकांनी आज धामणगाव आवारी ग्रामपंचायत च्या सी.सी.टी.व्ही पाहिला असता, प्रतिकेश सार्वजनिक शौचालयाच्या दिशेने जाताना दिसून आला.
शौचालयाच्या शेजारील शेतातील मकातून दुर्गधी येत असल्याने आतमध्ये जाऊन पाहिल्यानंतर प्रतिकेश या युवकाचा मृतदेह सापडला आहे. अकोले पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरिक्षक भुषण हांडोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे, पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
प्रतिकेश 20 तारखेला धामणगाव आवारी गावात आल्यानंतर गावातील कृषी सेवा केंद्रातून कीटकनाशक रोगोर आणि दुसर्या दुकानातून पाण्याची बाटली घेऊन जात असताना सी.सी.टी.व्ही कैद झाला आहे.
प्रतिकेशच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूची सखोल चौकशीची मागणी केली आहे, त्याच्यासोबत नक्की काय प्रकार घडला आहे, त्याने हे टोकाचं पाऊल का उचलले असावे हे समोर यायला पाहिजे, अशी मागणी प्रतिकेशच्या भावाने केली आहे. प्रतिकेश याच्यावर शोकाकुल वातावरणात धामणगाव पाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.