
अहमदनगर- पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या व सासर्याच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारून त्यांना जखमी केले होते. उपचादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.
किर्ती महेश भेटे (22) व विश्वनाथ केशव कसबे (54, दोघे रा. ढवणवस्ती, तपोवन रोड) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जावई महेश माणिक भेटे याच्याविरूध्द खूनाच्या वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या अटकेत आहे.
सोमवारी दुपारी भिस्तबाग महाल परिसरात ही घटना घडली होती. यासंदर्भात रेखा विश्वनाथ कसबे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांची मुलगी कीर्ती हिचे महेश याच्याशी चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ते दोघे भाडोत्री घरात राहत होते. महेश याच्यापासून किर्तीला एक मुलगा झाला. दोन वर्षांपासून महेश हा किर्तीला त्रास देत होता. त्यामुळे सासरे विश्वनाथ कसबे यांनी भरोसा सेलमध्ये तक्रार दिली होती.
घटस्थापनेच्या एक दिवसआधी महेश याने किर्तीला मारहाण केली होती. तसेच किर्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन तो घरातून निघून गेला होता. तेव्हापासून किर्ती एकटीच राहत होती. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रारही दिलेली होती. यानंतर ती वडिलांकडे राहत होती. दरम्यान सोमवारी महेशने किर्तीसह सासरे विश्वनाथ यांना लोखंडी वस्तूने मारहाण केली होती.
या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दाखल गुन्ह्यात वाढीव खुनाचे कलम लावण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी करीत आहेत.