
अहमदनगर- 21 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या तळेगाव (ता. संगमनेर) प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या निंबाळे येथील प्रवरा तीरावर असलेल्या पंप हाउसला रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास आग लागून अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या निंबाळे येथील पंप हाऊसला रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास विजेचे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. लागलेल्या आगीत योजनेचे पंप हाउस मधील सर्व साहित्य जळून खाक झाले.
योजनेच्या विद्युत मोटारीही आगीने नादुरुस्त झाल्या आहेत. लागलेल्या या आगीत अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष प्रभाकर कांदळकर, संगमनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. माळी, योजनेचे सचिव बाळासाहेब आंबरे यांनी सोमवारी सकाळी पाहणी केली.
तळेगाव प्रादेशिक योजनेच्या निंबाळे पंप हाउसला आग लागल्याने अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती योजनेचे सचिव बाळासाहेब आंबरे यांनी दिली. त्यामुळे योजनेच्या वडगावपान येथील पाणी साठवण तलावात होणारा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.