अहमदनगर- कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा पिकअप शेंडी बायपासजवळ गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी पेटवून दिला. कत्तलीसाठी जनावरांची वाहतुक करणार्या दोघांना गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
जावेद मुसा पठाण (वय 28) व अजमद मस्तान शहा (दोघे रा. ममदापुर ता. राहाता) अशी त्यांची नावे असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस नाईक दीपक गांगर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कत्तलीसाठी जनावरांची वाहतुक करणार्या पठाण व शहा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
त्यांच्या ताब्यातील एक लाख 20 हजार रूपये किंमतीचा पिकअप, दोन मयत गाई, 18 मयत वासरे, तीन जीवंत जखमी झालेल्या गाई व पाच वासरे असा दोन लाख 40 हजार रूपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. जावेद पठाण व अजमद शहा यांनी गोवंशीय जनावरे पिकअपमध्ये भरून ते कत्तलीसाठी विक्री करण्यासाठी नगर येथे घेऊन येत होते. याची माहिती गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी शेंडीबायपास येथून त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असताना सदरचा पिकअप शेंडीबायपास जवळच पलटी झाला. त्या पिकअपमधील तब्बल 18 वासरे, दोन गाई मयत झाल्या तर तीन गाई जखमी झाल्या आहेत.
दरम्यान संतप्त झालेल्या गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी सदरचा पिकअपमधून गोवंशीय जनावरे बाहेर काढले. पठाण व शहा यांना मारहाण करत त्यांचा पिकअप पेटवून दिला. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सदरचा पिकअप व जनावरे ताब्यात घेत पोलिसांत गुन्हा दाखल केला.
दरम्यान पठाण व शहा यांना मारहाण केल्याप्रकरणी पठाण याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांगदेव भगत, सिध्दार्थ कराळे, भुषण भिंगारदिवे, नवनाथ भगत, बबलू ऊर्फ संदीप भगत, ज्ञानु दाणी, अतुल कराळे, योगेश संतोष शिंदे, विकास चव्हाण व इतर चार ते पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.