
अहमदनगर- तीन व्यक्तींनी मिळून प्राजक्ता सुरेश धस (वय 51) व त्यांचा मुलगा सागर सुरेश धस (दोघे रा. सुखकर्ता कॉलनी, सावेडी) यांची कांदा-खरेदी विक्रीच्या व्यवसायातून एक कोटी 58 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. प्राजक्ता धस यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अमित अरविंद कर्णीक, विनीता जोशी, अनिकेत अरविंद कर्णीक (रा. जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द, पुणे) यांच्या विरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राजक्ता धस व त्यांचा मुलगा सागर सुरेश धस हे दोघे शेती व शेती निगडीत मालाचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यासाठी त्यांनी मच्छिंद्रनाथ ओव्हरसीस प्रा.ली. ही कंपनी स्थापन केली आहे. त्यांचे ओळखीचे कुंडलीक सोनटक्के (रा. जामगाव ता. आष्टी, जि. बीड) यांनी मार्च 2022 मध्ये फिर्यादी व त्यांच्या मुलाची ओळख अमित कर्णीक आणि विनीता जोशी यांच्यासोबत करून दिली होती.
सोनटक्के यांनी ओळख करून देताना फिर्यादी यांना सांगितले होते की, अमित व विनीता हे शेतीमालाचा इंम्पोर्ट व एक्सपोर्टचा व्यवसाय करीत असुन त्यांची ऍमीविन ग्लोबल एक्सपोर्ट ही कंपनी आहे. ते या कंपनी मार्फत शेतीमाल परदेशात पाठवितात. तुमचा मराठवाड्यात मोठा जनसंपर्क असल्याने त्यांची तुमचे बरोबर शेतीमालाचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करायची इच्छा आहे. तुम्ही कांदा खरेदी करून तो परदेशात पाठवु शकता असे सांगितले होते. फिर्यादी यांनी विश्वास ठेवून त्याचे सोबत व्यापार करण्यास होकार दिला होता.
त्यावेळी त्यांच्यात असे ठरले की कांदा फिर्यादी व मुलगा सागर यांनी शेतकरी किंवा व्यापारी याचेकडुन जमा करून तो अमित कर्णीक व विनीता जोशी यांना आय बी रोडलाईन्स् मार्फत अमित कर्णीक व विनीता जोशी यांचे मिविना ग्लोबल एक्सपोर्ट कंपनीच्या नावे पाठविण्याचे ठरले होते. ठरल्या प्रमाणे फिर्यादी व त्याच्या मुलाने साधारणत: एप्रिल-2022 पासून जुन 2022 पर्यंत निस्सार ट्रेडर्स (कडा, ता. आष्टी, जि. बीड) यांचेकडुन कांदा खरेदी करून त्यानंतर कांदा जमा करून तो आय बी रोडलाईन्स् मार्फत अमित कर्णीक व विनीता जोशी यांचे मिविना ग्लोबल एक्सपोर्ट कंपनीच्या नावे पाठविला होता. कांदा खरेदी करण्याकरीता अमित कर्णीक व विनीता जोशी यांचे वतीने अनिकेत अरविंद कर्णिक हा आष्टी येथे येत असे व कांदा खरेदी करून घेवून जात असे.
दरम्यान फिर्यादी व त्यांच्या मुलाने अमित कर्णीक व विनीता जोशी यांना कांदा खरेदीचे पैशाची मागणी केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते. काही दिवसांनी पुन्हा पैशाची मागणी केली असता त्यांनी फिर्यादी यांना कांदा विक्रीचे पैसे जमा होणार आहेत, काही दिवसात पैसे देवु असे सांगून मिवीना ग्लोबल एक्सपोर्ट कंपनीमध्ये फिर्यादी व मुलगा सागर यांना 49 टक्के इतके भागीदार म्हणून सामील करून घेतले होते. त्यानंतर अमित कर्णीक व विनीता जोशी यांनी पुन्हा फिर्यादीचा विश्वास संपादन करून व्यवसायाकरीता पैशाची गरज आहे असे सांगून वेळोवेळी 90 लाख रूपये घेतले. अमित अरविंद कर्णीक, विनीता जोशी व अनिकेत अरविंद कर्णीक यांनी संगनमत करून कांदा खरेदी करून खरेदी केलेले कांदा मालाचे 68 लाख रूपये व व्यवसायासाठी दिलेले 90 लाख रूपये असे एकुण एक कोटी 58 लाख रूपये फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.