
अहमदनगर- भारतीय जनता पक्षाचे संगमनेर शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर नगर परिषदेच्या अमरधाम स्मशानभूमीच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी बदनामी केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.
अमरधाम स्मशानभूमीच्या कामात संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. गणपुले यांनी तीस लाख रुपये घेतल्याचा आरोप अमर कतारी यांनी मागील महिन्यात पत्रकार परिषद घेऊन केला होता. यानंतर गणपुले यांनी कतारी यांच्या विरोधात फिर्याद दिली. कतारी यांच्या विरोधात न्यायालयात दावे दाखल असल्याने त्याचा राग मनात धरून त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरोधात तीस लाख रुपये घेतल्याचा आरोप केला असे गणपुले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी अमर कतारी यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
मानहानीचा दावा दाखल करणार
कतारी यांनी आपल्या विरुद्ध तीस लाख रुपये घेतल्याचा आरोप करून आपली बदनामी केली आहे. आपण कतारी यांच्या विरोधात न्यायालयात अब्रू नुकसान भरपाईचा दावा आज बुधवारी दाखल करणार आहोत, असे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अँड श्रीराम गणतूले यांनी सांगितले.
दरम्यान याबाबत अमर कतारी यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात कोणता गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत आपणास कल्पना नाही असे त्यांनी सांगितले. आपण यापूर्वीच तक्रार अर्ज दिलेला आहे या अर्जाबाबत अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे मी दुसर्यांच्या अर्जाचा काय विचार करू. नगरपालिका निवडणूक जवळ आल्याने आपले विरोधक राजकीय स्टंट करीत असल्याचा आरोप कतारी यांनी केला आहे.