
अहमदनगर- सातबारा उतार्यामध्ये नोंद लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे 18 हजार रूपये लाचेची मागणी करणार्या शेवगाव तलाठी कार्यालयातील कॉम्प्युटर ऑपरेटर व खासगी व्यक्तीविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी ही कारवाई केली.
कॉम्प्युटर ऑपरेटर विजय धनवडे व खासगी व्यक्ती आरिफ पठाण (दोघे रा. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. माळीवाडा (शेवगाव) येथील तक्रारदार यांनी सन 2020 मध्ये माळीवाडा भागातील गट नं. 1512/1/अ/1 मध्ये दोन गुंठे जमीन खरेदी केली आहे. त्या जमीनीच्या सातबारा उतार्यामध्ये तक्रारदार यांच्या नावाची नोंद लावून देण्यासाठी आरिफ पठाण याने शेवगाव तलाठी सजा येथे पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपये द्यावी लागतील म्हणून तडजोडीअंती 18 हजार रूपये लाचेची मागणी केली.
तसेच विजय धनवडे याने सदर पैसे हे भाऊसाहेबला मॅनेज करण्यासाठी द्यावे लागतात, जेवढे मागितले तेवढे द्यावे लागतील तरच तुमची नोंद होईल, असे म्हणून लाच मागणी केली, म्हणून गुरूवार, 20 ऑक्टोबर रोजी दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.