
अहमदनगर- ऑनलाईन कोणाची कशी फसवणूक होईल सांगता येत नाही. अलीकडच्या काळात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असाच एक फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
शेअर ट्रेंडीग मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिषाने अकोले तालुक्यातील शिक्षकाची 50 लाख 63 हजार रूपयांची फसवणूक झाली.
मे, 2021 ते 23 जून, 2022 दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी 6 ऑक्टोबर रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांना मे 2021 रोजी अदित्य पटेल नावाच्या व्यक्तीने फोन करून शेअर ट्रेंडीग मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार त्यांनी काही रक्कम गुंतविली. या रक्कमेचा परतावा त्यांना दिला. त्यानंतर त्यांची ओळख दिनकरभाई मेहता, गौतम शहा, रितेश भाई यांच्याबरोबर झाली. त्यांच्याशी वेळावेळी झालेल्या संभाषणाप्रमाणे शेअर ट्रेंडीगमध्ये 50 लाख 63 हजार रूपयांची गुंतवणूक केली.
त्यानंतर आरोपींचे मोबाईल बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गुरूवारी, 6 ऑक्टोबर रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.