
अहमदनगर- चार जणांनी दोघांवर छऱ्याच्या बंदुकीच्या गोळ्या झाडून व लोखंडी गजाने वार केले. कर्जत तालुक्यातील सिद्धटेक गावाच्या शिवारात ही घटना घडली. रात्रीच्या वेळी हा हल्ला करण्यात आला आहे.
या हल्ल्यात भांबोरा (ता. कर्जत) येथील योगेश सोमनाथ लोणकर व सचिन दिलीप कांबळे (वय ३७) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर दौंड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सागर वसंत हिरभगत, करण संदिप माने, कृष्णा उर्फ लाला सुखदेव हिरभगत, शंभु सुभाष हरीहर, (सर्व रा. भांबोरा, ता. कर्जत) यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, सागर वसंत हिरभगत याने सोमवारी रात्री योगेश लोणकर व सचिन कांबळे यांना तुम्हाला खर्च करतो, असे म्हणून वडार वस्ती येथील दादा शिंदे यांच्या शेताजवळील रस्त्यावर बोलावून घेतले. त्यानंतर करण माने, कृष्णा हिरभगत व शंभु हरीहर यांनी योगेश लोणकर यांच्या पोटावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. तसेच सचिन कांबळे यांच्या डोक्यावर व तोंडावर लोखंडी गजाने वार करून गंभीर जखमी केले. जमिनीच्या कारणावरून हे वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ अधिक तपास करीत आहेत.