
अहमदनगर- डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. संगमनेर तालुक्यातील वडगावपान फाटा याठिकाणी हा अपघात झाला.
सुनील जालिंदर लांडगे (रा. वडगाव लांडगा ता. संगमनेर) व अक्षय तात्यासाहेब रोकडे (रा. दुर्गापूर ता. राहाता) अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे असून कावेरी तात्यासाहेब रोकडे असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
गुरुवारी (दि. 20 ) सकाळी 10 वाजेच्या सुमारास लोणी ते संगमनेर रस्त्यावर वडगावपान फाटा याठिकाणी ही भीषण अपघाताची घटना घडली. वडगाव लांडगा येथील सुनील जालिंदर लांडगे हे दुचाकीवरून (क्रमांक एमएच 15 बीएफ 9387) काही कामानिमित्त राहाता येथे जात होते. त्यांच्या समवेत अक्षय तात्यासाहेब रोकडे व कावेरी तात्यासाहेब रोकडे होते.
त्यांची दुचाकी वडगावपान फाट्यावर आली असता विना क्रमांकाच्या डंपरने त्यांच्या दुचाकीस समोरासमोर धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात सुनील जालिंदर लांडगे व अक्षय तात्यासाहेब रोकडे हे दोघे युवक जागीच ठार झाले. तर कावेरी तात्यासाहेब रोकडे ही मुलगी गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. युवक काँग्रेसचे संगमनेर तालुका अध्यक्ष निलेश थोरात सहित कार्यकर्त्यांनी मदतकार्य केले. जखमी मुलीस उपचारार्थ संगमनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपसणीसाठी हलविले. याप्रकरणी डंपर चालका विरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार लक्ष्मण औटी यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी अपघाताच्या या घटनेचा तपास सुरु केला आहे. संगमनेर ते लोणी या डांबरी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत असून रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी काँग्रेसचे संगमनेर तालुका अध्यक्ष निलेश थोरात यांनी केली आहे.