
अहमदनगर- पारनेर तालुुक्यातील मांडओहळ धरण रस्त्यावर भरदिवसा ठेकेदारावर गोळीबार झाला. म्हसोबा झाप येथील स्वप्निल जयसिंग आग्रे (वय २५ रा. म्हसोबा झाप) हे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्या वाहनावर गोळीबार केला. त्यात स्वप्नील आग्रे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.
शक्ती नारायण राय, नितीश गुड्डूु (दोघेही परप्रांतीय, हल्ली राहणार राजूरी, जिल्हा पुणे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोघे जण पसार झाली आहेत. पाठलाग करून गोळीबार करणार्या चौघांनी स्वप्नील आग्रे याच्या चार चाकी गाडीचा ताबा घेतला आणि जखमी आग्रे यास तेथेच टाकून पळ काढला. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी पोखरीकडे जाणार्या रस्त्यावरील गावांमधील तरुणांना गाडीची व घटनेची माहिती दिली.
यानंतर तरुणांनी सदर गाडी पोखरी परिसरात रोखली. गाडीतील तरुणांच्या हातात दोन गावठी कट्टे होते. या तरुणांना स्थानिक तरुण व ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, सदरचे तरुण हे गवंडी काम करणारे परप्रांतीय असल्याचे समजते. हल्लेखोर तरुण हे स्वप्नील आग्रे याच्याकडे गवंडी काम करत होते आणि त्यांना आज स्वप्नील आग्रे याला मोठे पेमेंट मिळणार असल्याची माहिती मिळाली होती. ही रोकड लुटण्याच्या इराद्यानेच त्यांनी स्वप्नील याच्यावर गोळीबार केला असावा असा अंदाज आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व सहकार्यांनी घटनास्थळ गाठले. हल्लेखारांकडून अधिकची माहिती घेतली जात आहे.