अहमदनगर- लष्कराच्या बनावट एनओसी प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या. रोहन किशोर धेंडवाल (रा. विद्या कॉलनी, जामखेड रोड) असे त्याचे नाव आहे. त्याला अलिबाग येथून ताब्यात घेत अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात राजा ठाकूर याला यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. पोलीस कोठडीत त्याची सध्या चौकशी सुरू आहे.
येथील प्रांत कार्यालयातील महसूल सहायक संजय गोलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन प्रकरणात बनावट एनओसी देऊन फसवणूक झाल्याचे यात म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून दोन दिवसापूर्वीच पोलिसांनी यातील प्रमुख राजा ठाकूर याला अटक केली आहे. न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणातील धेंडवाल याला अटक केली आहे.
धेंडवाल याला यापूर्वीही चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तो पसार झाला होता. तो अलिबाग येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, सलीम शेख, अभय कदम, बंडू भागवत, रवी टकले, सुमित गवळी, दीपक बोरूडे, अतुल काजळे, बापू गोरे, गणेश ढोबळे, अनुप झाडबुके यांचे पथक अलिबाग येथे गेले.
पोलिसांनी वेशांतर करून वर्सोली समुद्र किनारी पाणीपुरी, नारळ पाणी, सरबत विक्रेत्याच्या रूपात सापळा रचला व धेंडवाल याला ताब्यात घेऊन नगरला आणले.
दरम्यान धेंडवाल याच्या चौकशीतून बनावट एनओसी कोणी तयार केली, खोटे शिक्के कुणी तयार केले, या रॅकेटमध्ये आणखी कुणा-कुणाचा समावेश आहे, किती जणांना बनावट एनओसी तयार करून देण्यात आल्या, याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.