अहमदनगर- संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणार्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करत असताना पारनेर तालुक्यातील सुपा जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेने मुख्याध्यापकाला मारहाण केली. काल रविवारी सकाळी ही घटना घडला. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पहिली फिर्याद रामेश्वर काळे यांनी दिली असुन त्यात त्यांनी म्हटले आहे की, गांधी जयंती निमित्त फुलांचा हार गांधीजींच्या प्रतिमेला घालत असताना जुन्या रागातून याच शाळेतील एक शिक्षिकेने पाठीमागुन येऊन मारहाण केली.
यावेळी तेथे सहकारी शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सर्वासमोर या शिक्षकेने मारहाण केली असे म्हटले आहे.
प्रतिभा शांताराम पाचरणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी सकाळी मुख्याधापक काळे हे उशीरा आल्याने मी त्यांना उशीर का झाला म्हणून विचारणा केली असता त्यांनी मला शिवीगाळ केली असे फिर्यादीत म्हटले आहे. गांधी जयंतीच्या दिवशी जयंती साजरी करत असतांना शिक्षकांची भांडणे पालक विद्यार्थांसमोर झाल्याने ही बातमी काही वेळात गावभर पोहचली.
याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी मोठी नाराजी व्यक्त केली. पोलीस ठाण्यात सरपंच रोकडे, उपसरपंच दत्तात्रय पवार, सागर मैड, विजय पवार, विलास पवार, पप्पु पवार, डॉ. डिएन पवार, विठ्ठल पवार, प्रदिप पवार, महिला पालक उपस्थित होते, यावेळी अनेक माहिला व पालकांनी त्या शिक्षिकेच्या तक्रारीचा पाढाच वाचला.
शिक्षिकेच्या बदलीची मागणी
या शाळेतील शिक्षकाच्या यापुर्वीही अनेक तक्रारी आल्या असुन त्याच्यात यापुर्वीही खुप वाद विवाद झाले आहेत. आजची भांडणे विद्यार्थी व पालकांसमोर झाली हा अतिरेक झाला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर वेगळा परिणाम होत आहे. यामुळे शिक्षिकेची बदली करण्यात यावी तसेच ग्रामसभेत बदलीचा ठराव करुन पंचायत समिती जिल्हा परिषदला कळवावा अशी मागणी पालकांनी केली आहे.