
अहमदनगर- मुळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील व सध्या राचकोंडाचे (तेलंगणा) पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी मोठी कारवाई केली. त्यांनी नगरकडे येणारा गांजा पकडला आहे. हा गांजा ओरिसा राज्यातून नारळाच्या पोत्यामधून दडवून येत होता.
एका ट्रकमधून नाराळाच्या पोत्यांमध्ये लपवून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना वाहन अडवून ही कारवाई केली. यामध्ये विकास बबन साळवे (रा. सुकेवाडी रोड, संगमनेर), विनोद चंद्रभान राळकर (रा. रांजणगाव देशमुख, कोपरगाव), किशोर तुळशीराम वाडेकर (संगमनेर) व कोसाचिट्टी बाबू (रा. ओरिसा) यांना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून नऊशे किलो गाजांसह सुमारे दोन कोटी रूपयांचा मुद्देमाल हस्त हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिली. यातील मुख्य आरोपी योगेश दत्तू गायकवाड (रा. संगमनेर) हा पसार झाला आहे. सोमवारी सकाळी तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई केली.
हे सर्व जण ओरिसामधून हा गांजा नगर जिल्ह्यात घेऊन येत होते. त्यांनी यापूर्वीही असे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी उघडकीस आली आहे. त्यांच्याकडे अधिक तपास केला जात असून नगर जिल्ह्यात ते गांजा कोठे वितरित करणार होते, याचाही शोध घेतला जात आहे.