
अहमदनगर- संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणामध्ये बुधवारी कोतवाली पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये बनावट सोन्याचे आणखी घबाड हाती लागले आहे. पोलिसांनी 19 कर्जदारांची 44 खाती तपासली, या 44 सोनेतारण कर्ज खात्यांमध्ये तीन हजार 21 ग्रॅम (तीन किलो) वजनाचे बनावट दागिने आढळून आले.
त्याव्दारे संस्थेची एक कोटी दोन लाख 84 हजार 800 रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आतापर्यंत सुमारे साडेसात किलो बनावट दागिने आढळून आले असून, याव्दारे संस्थेची सुमारे 2.50 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.
कोतवाली पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासामध्ये दररोज धक्कादायक बाबी समोर येत आहेत. इतर तीन पतसंस्थांकडून अद्यापही तपासणीबाबत संपर्क साधण्यात आलेला नाही. या पतसंस्थांमध्येही मोठ्या प्रमाणात बनावट दागिने ठेवून कर्ज घेण्यात आल्याचे तपासात समोर आले होते.
दरम्यान, या फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपींनी काही एजंटांचीही नियुक्ती केली होती, असे तपासात समोर आले आहे. अशा सात एजंटांची नावे तपासात निष्पन्न झाली असून, त्यातील एकास यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या 40 पेक्षा अधिक झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.