
अहमदनगर- अडचणीत असल्याची बतावणी करत किरकोळ पैशांची मदत घेणे, संपर्कासाठी नंबर घेऊन काही दिवसांनी पैसे परत करत विश्वास संपादन करणे, ओळख वाढवून परदेशात नातेवाईक असल्याचे सांगत त्यांच्याकडून स्वतात सोने, कपडे देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारी व सहकार्य न केल्यास खून करणारी दाक्षिणात्य राज्यातील टोळी महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे.
समीरा रंगावाला उर्फ सिमरन, सौम्या रंगावाला उर्फ फरीदा उर्फ सुधा उर्फ गीता व आमिर अली उर्फ आर्यन अशी या टोळीतील तिघांची नावे आहेत.
नगरसह काही जिल्ह्यात या टोळीने नागरिकांना आमिष दाखविले असल्याचे समोर आले असून, त्यांच्या शोधासाठी केरळ पोलिसांचे पथक नगरमध्ये दाखल झाले आहे.
नगरसह इतर जिल्ह्यातही या टोळीचे काही काळ वास्तव्य होते असे केरळमधील कुन्नर ग्रामीण पोलिसांच्या क्राईम ब्रँच पोलीस निरीक्षक टी. पी. रजिश यांनी सांगितले. त्यांनी येथील तीन कुटुंबीयांसमवेत ओळखही निर्माण केली होती. या कुटुंबीयांना स्वस्तात सोन्याचे व व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र, त्यांना शंका आल्याने त्यांनी या लोकांशी फारसा संबंध ठेवला नाही व त्यांची फसवणूक टळली.
अशा व्यक्तींपासून नागरिकांनी सावध राहावे व त्यांच्या बाबत काही माहिती मिळाल्यास स्थानिक पोलिसांशी किंवा केरळ पोलिसांची संपर्क करावा, असे आवाहनही केरळ पोलिसांच्या पथकाने केले आहे.