
अहमदनगर- येथील जिल्हा ग्राहक न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. चोरीस गेलेल्या दुचाकीचा एक वर्षाचा विमा काढलेला असताना नुकसान भरपाईस टाळाटाळ करणार्या विमा कंपनीला दुचाकीच्या रक्कमेसह व्याजाची रक्कम अदा करण्याचा आदेश दिले आहेत. श्रीरामपूर येथील नंदकुमार रंगनाथ राऊत यांनी नवीन विकत घेतलेली दुचाकी घरासमोर लॉक करून पार्कींग केलेली असतांना रात्रीच्या वेळी चोरीला गेली होती.
म्हणून श्री. राऊत यांनी पोलिस स्टेशनला गाडी चोरी गेल्याची फिर्याद दिली. त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला गु.र.नं. 16/2018 ने गुन्हा दाखल झाला. नंदकुमार राऊत यांनी गाडीचा इंन्शुरन्स टाटा आय. जी. जनरल इंन्शुरन्स कंपनी 1 वर्षासाठी उतरविलेला होता.
म्हणून त्यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी इंन्शुरन्स कंपनीकडे पत्र व्यवहार केला. म्हणून इंन्शुरन्स कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे नाकारले. नंदकुमार राऊत यांनी अहमदनगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर यांच्यासमोर तक्रार दाखल केली. सदर तक्रार अर्जाची चौकशी होवून आयोगाने इंन्शुरन्स कंपनी विरूध्द निकाल दिला.
इन्शुनंन्स कंपनीने रक्कम रूपये 44,849/- व त्यावर संपूर्ण रक्कम फिटेपावेतो 12 टक्के व्याजदराने व्याज तक्रारदारास द्याावे. तसेच शारीरीक व मानसिक त्रासाबद्दल 10,000/- रूपये व अर्जाचा खर्च 5,000/- तक्रारदारास द्यावा, असा आदेश इंन्शुरन्स कंपनीला देण्यात आला. सदर तक्रारीचे कामकाज तक्रारदाराचेवतीने श्रीरामपूर येथील अॅड. किरण जर्हाड यांनी पाहिले.