अहमदनगर- प्रवरा नदीपात्रात एका अनोळखी तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-उक्कलगांव दरम्यान असलेल्या प्रवरा नदीपात्रात हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काल दुपारच्या सुमारास उक्कलगाव परिसरातील प्रवरा नदीपात्राच्या कडेला असलेल्या फक्कडराव थोरात यांच्या केळीच्या बागेजवळच एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सदर तरुणाचा मृतदेह हा जवळपास 15 ते 20 दिवसांपासून असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
कारण या मृतदेहाच्या अंगावर मांस राहिलेले नसून केवळ कवटी दिसून आली. त्यामुळे या व्यक्तीची हत्या की आत्महत्या? याबाबत अंदाज वर्तविले जात आहे.
या घटनेची माहिती दिलीप मारुती थोरात यांनी पोलिसांना कळविली. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटणे अशक्य असल्याचीही चर्चा परिसरात होती.
या घटनेने परिसरात खळवळ उडाली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरुवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस कर्मचारी श्री. भिंगारदे, श्री. बडे आदी पोलीस पथकाने जावून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
हा तरुण कोण ? कुठलचा ? तो पाण्यात कधी बुडाला ? का त्याची हत्या करून मृतदेह प्रवरा नदीत फेकण्यात आला ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून मयताचा चेहरा कुजून कवटी उघडी पडलेली दिसत आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.