
अहमदनगर- एका तरूणीचे एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. त्या अकाऊंटवर तिचे अश्लिल फोटो असलेला व्हिडीओ तयार करून पोस्ट केला. श्रीरामपूर शहरातील एका तरूणीच्या बाबतीत हा प्रकार घडला. तरूणीची बदनामी झाल्याने तिने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी एका मोबाईल नंबर धारक व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 354 (ड), 506 सह माहिती तंत्रज्ञान कलम 66 (डि), 67 (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर शहरातील फिर्यादी यांचे नावे एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. त्यावर फिर्यादीचा फोटो वापरला. या अकाऊंटवरून फिर्यादीचे अश्लिल फोटो असलेला व्हिडीओ प्रसारित केला.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तसेच फिर्यादीस एका व्हॉट्सअप नंबरवरून त्यांचे फोटो व्हायरल करण्याची धमकीचे मेसेज केले आहेत.
हा प्रकार 26 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान वेळोवेळी घडला आहे. फिर्यादी यांनी 11 ऑक्टोबर रोजी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.