
अहमदनगर- नगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही व्यक्तींनी थेट माजी सैनिकावर लोखंडी रॉड, चाकूने हल्ला करून जखमी केले आहे. तर त्यांच्या पत्नीसोबत गैरवर्तन केले आहे. प्लॉटवरील बोर्ड काढण्याच्या कारणातून हा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी जखमी माजी सैनिकाने 25 सप्टेंबर रोजी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंन्टू बबन भिंगारदिवे, संदीप बबन भिंगारदिवे, त्यांच्या पत्नी, आई-वडिल व बहिण (नावे माहिती नाही, सर्व रा. भिंगारदिवे मळा, प्रेमदान हाडको) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी यांनी एक प्लॉट खरेदी केला आहे. त्या प्लॉटवर गेल्यानंतर फिर्यादी यांना पिंन्टू, संदीप व त्यांचे नातेवाईक दमदाटी करत होते. फिर्यादी हे पत्नीसह 21 सप्टेंबर रोजी दुपारी प्लॉटवर गेले होते. प्लॉटवर लावलेला बोर्ड काढत असताना तेथे पिंन्टू, संदीप व त्यांचे नातेवाईक तेथे आले.
त्यांनी फिर्यादीला लोखंडी रॉड व चाकूने मारहाण केली. फिर्यादीच्या पत्नीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. घटनेची माहिती फिर्यादी यांनी तोफखाना पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता मारहाण करणारे पसार झाले होते. जखमी फिर्यादी यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.