
अहमदनगर- बनावट सोनेतारण प्रकरणी तपासादरम्यान आणखी एका एजंटाचे नाव कर्जदारांच्या जबाबातून समोर आले आहे. महापालिकेतील ठेकेदारांच्या गोतावळ्यात ही व्यक्ती दररोज वावरते, असेही चौकशीत समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सोने तारण प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे कोतवाली पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासाचा अहवाल पूर्ण करून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केला जाणार आहे.
कोतवाली पोलिसांकडून गेल्या महिनाभरापासून शहर बँक व नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणाचा तपास सुरू आहे. या दोन्ही संस्थांमधील सोनेतारण कर्ज खात्यांमध्ये आतापर्यंत सुमारे १७ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत.
या दोन्ही संस्थांची सुमारे ६ कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. कर्जदारांकडून नोंदविलेल्या जबाबांमध्ये काही एजंटांची नावे निष्पन्न झालेली आहेत. या सर्व चौकशीचा अहवाल कोतवाली पोलिसांकडून तयार केला जात असून, तो लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केला जाणार आहे.
दोन ते तीन कर्जदारांकडून मिळालेल्या माहितीमध्ये आणखी एका नवीन एजंटाचे नाव समोर आले असून, सदरची व्यक्ती महापालिकेतील ठेकेदार असल्याचे व दररोज राजकीय नेते मंडळी व ठेकेदारांच्या गोतावळ्यात वावरत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सदरची व्यक्ती ही बनावट सोनेतारण प्रकरणामधील प्रमुख आरोपींच्याही यापूर्वी संपर्कात होती, अशीही चर्चा सुरू आहे.