अहमदनगर- येथील आर्मी स्टेशन हेडकॉर्टरचे बनावट ना हरकत (एनओसी) तयार करण्यात आले होते. तसा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी मंगळवारी जामखेड रोडवरील विद्या कॉलनी येथे कारवाई करत लष्कराचा कर्मचारी असलेला राजेंद्र सिंग देशराज सिंग उर्फ राजा ठाकूर (रा. सैनिकनगर, केकती, निंबोडी) याला अटक केली आहे.
तो बनावट एनओसी प्रकरणात तो प्रमुख असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, त्याची पत्नी लष्करातील एका वरिष्ठ अधिकार्याची पीए असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बबन भागचंद बेरड (रा. भिंगार ता. नगर), आमीर तकी मिर्झा (रा. मुकुंदनगर), निलेश प्रेमराज पोखर्णा व इतर पाच यांच्या प्रकरणात आर्मी स्टेशन हेडकॉर्टरची बनावट एनओसी दिल्याची फिर्याद 28 सप्टेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात 14 ते 15 जणांची चौकशी केली. त्यानंतर तपासात मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र सिंग उर्फ राजा ठाकूर याचे नाव समोर आले. गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते.
मंगळवारी सकाळी तो विद्या कॉलनी येथील राहत्या घरी असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. त्यांनी माहितीची खात्री केल्यानंतर पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक इंगळे, पोलीस अंमलदार दीपक बोरूडे, सलीम शेख, बंडू भागवत, रवींद्र टकले, बापूसाहेब गोरे, अभय कदम, सुमित गवळी, अतुल काजळे, दीपक कैतके, गणेश ढवळे, अनुप झाडबुके, महिला पोलीस अंमलदार पठारे यांच्या पथकाने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
पोलिसांच्या पथकाने संपूर्ण घराला घेराव घातला होता. घरातील काही सदस्यांनी पोलिसांच्या कारवाईला जोरदार विरोध करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विरोध जुगारून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. कोतवाली पोलिसांकडून सायंकाळी उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक केली. बनावट एनओसी प्रकरणातील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता यातून व्यक्त होत आहे.