एक्सप्रेस मराठी | बीड : शेतकरी अनेक समस्यांचा सामना करून आपल्या साठी धान्य पिकवतात म्हणूनच शेतकर्यांना सार्या जगाचा पोशिंदा म्हंटले जाते. शेती करताना त्यांना कायमच संकटाशी सामना करावा लागतो कधी नैसर्गिक संकट तर कधी पिकाला कमी हमीभाव मिळणे. अशातच आता शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अळीचं नवं संकट उभं राहिलंय. या घोणस अळीचा (Ghonas worms) परिणाम पिका बरोबर माणसांवर देखील होताना दिसतोय अशीच एक घटना बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) तालुक्यात हा प्रकार उघडकीस आली आहे.
दिवसेंदिवस होणार्या वातावरणातील बदलामुळे शेतातील पिकांवर अनेक परिणाम होत आहेत. पिकांवर विविध प्रकारच्या कीड पडत आहेत. मात्र, घोणस नावाची एक अळी जी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. घोणस नावाची विषारी अळी अंगावर पडून तिने चावा घेतल्यानं असह्य वेदना झाल्यानं तीन शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली आहे. यामुळं शेतकरी वर्गाच्या मनात धडकी भरली आहे. हा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील शिराळा (Sharala) गावात उघडकीस आला आहे.
घोणस नावाची विषारी अळीनं चावा घेतल्यानं तीन शेतकऱ्यांना त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी दिली आहे. ही अळी म्हणजे कोणत्याही पिकावरील किड नाही तर एक रानटी गवतावरील अळी आहे. जास्त प्रमाणात जर या अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर क्लोरोसायफर (chloro cypher) फवारणं गरजेचं असल्याची माहिती देखील गोरख तरटे यांनी दिली. परंतू जास्त प्रमाणात प्रादुर्भाव नसेल तर काही फवारण्याची गरज नाही. मात्र, शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी म्हणून अळीपासून संरक्षण करण्यासाठी फुल कपडे घालणे गरजेचे आहे. तसेच ही अळी शरीरावर येऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केलं आहे.
बीड जिल्ह्यात आता शेतकऱ्यांपुढं नवीन अस्मानी संकट आलं आहे. या घोणस अळीने चावा घेतल्यास असाह्य वेदना अन उलट्या होत आहेत. दरम्यान, जिथे ही अळी आढळली तिथे जाऊन कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली. शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे.
(Web title : Ghonas Worms Crisis In Beed Distric)