Ahmednagar Murder Case: आई वडिलांना भेटण्यासाठी जाऊ असे म्हंटल्याने गर्भवती पत्नीला मारहाण करून तिचा खून केल्याची घटना.
श्रीरामपूर: रामपूर शहरातील वॉर्ड. नं. 6, कांदा मार्केट या भागात राहणार्या एकाच्या पत्नीने आई-वडिलांना भेटण्यासाठी जाऊ असे म्हटल्याने गर्भवती पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली गणेश गायकवाड असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील रहिवासी असलेला तिचा पती गणेश भिमा गायकवाड हा तिला घेऊन कामानिमित्त श्रीरामपूर येथे आला. याठिकाणी सोनालीचे आजोबा ज्ञानदेव आढागळे हे वॉर्ड नं. 6 कांदा मार्केटसमोर, भीमनगर येथे राहत होते. सोनाली व तिचा पती गणेश गायकवाड हे दोघेही त्यांच्याच खोलीत राहत होते.
दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान सोनाली ही घरात एकटी असताना तिचा पती गणेश भिमा गायकवाड, (वय 22), मूळ रा. शहागड, ता. अंबड, जि. जालना यास आपण आई-वडिलांना भेटण्यासाठी जाऊ असे म्हटल्याचा राग आला. त्याने पत्नी सोनाली गरोदर असताना तिला बेदम मारहाण करून तिच्या पोटावर दुखापत केली. त्यामुळे ती चक्कर येऊन खाली पडली. तिला औषधोपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी ती मयत झाली असल्याचे सांगितले.
याप्रकरणी सोनाली हिची आई वंदना भिमराव लोंढे (रा. खालापुरी, ता. शिरूर, जि. बीड) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी गणेश गायकवाड याच्याविरुध्द गुन्हा रजि. नं. 959/2022, भादंवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहेत.
Web Title: Husband Murder his pregnant wife