
अहमदनगर- गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी जिल्ह्यामध्ये फिरत असल्याची अफवा पसरली आहे. अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही याबाबतचे संदेश व्हायरल होत आहेत. मात्र, अशा घटना घडल्या नसून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. अशा अफवा पसरली जात आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवून त्याला खतपाणी घातले जात आहे. यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर असे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत.
मात्र, हे सर्व मेसेजेस व व्हिडिओ निराधार असल्याचे म्हटले आहे. अशा अफवा व मेसेजेस कोणीही व्हायरल करू नये. खात्री करूनच मेसेज फॉरवर्ड करावा, असे आवाहन अधीक्षक पाटील यांनी केले आहे. तसेच जर आपल्या परिसरामध्ये कोणी संशयित मिळून आल्यास त्यास कुठल्याही प्रकारची मारहाण न करता पोलिसांशी संपर्क साधावा. अशी अफवा पसरल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला मारहाण झाल्यास संबंधीत व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले आहेत.