
अहमदनगर- संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या केडगाव शाखेत शुक्रवारी पुन्हा तिघांच्या 11 कर्ज खात्यामध्ये सुमारे 85 तोळे बनावट सोन्याचे दागिने आढळून आले. त्यावर 28 लाख 64 हजार रूपयांचे कर्ज देण्यात आले आहे. फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी केलेल्या प्राथमिक तपासणीत एका कर्जदाराच्या दोन खात्यांमध्ये 221 ग्रॅम बनावट दागिने आढळून आले. त्याव्दारे दोन लाख 78 हजार रूपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद नागेबाबा मल्टीस्टेटकडून कोतवाली पोलिसात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शहर बँक प्रकरणातील चार आरोपींना या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींपैकी तिघांनी स्वतः बनावट सोने ठेवून कर्ज घेतलेले आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये या तिघांच्या 11 खात्यामध्ये सुमारे 850 ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे दागिने आढळून आल्याचे व त्याव्दारे 28 लाख 64 हजार रूपयांचे कर्ज घेण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.