
अहमदनगर- बनावट सोने प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी शहर सहकारी बँकेमध्ये एका व्यक्तीचे खाते तपासले. यामध्ये सुमारे 25 तोळे वजनाचे बनावट दागिने आढळून आले. त्याव्दारे आठ लाख 40 हजार रूपयांचे कर्ज घेण्यात आले आहे.
यापूर्वी शहर बँकेत सुमारे साडेनऊ किलो बनावट दागिने आढळून आले असून, त्याव्दारे बँकेची साडेतीन कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता या फसवणुकीच्या रकमेत वाढ होताना दिसत आहे.
दुसरीकडे नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये पुन्हा 61 तोळे बनावट दागिने आढळून आले आहेत. पाच कर्जदारांची नऊ कर्ज खाती तपासली असता, त्यात हे बनावट दागिने आढळून आले. याव्दारे 20 लाख 73 हजार रूपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. नागेबाबा मल्टीस्टेटमध्ये यापूर्वी सुमारे साडेसात किलो बनावट दागिने आढळून आले असून, त्याव्दारे अडीच कोटी रूपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले होते.