अहमदनगर- उंबरे (ता. राहुरी) येथे मुसळधार पाऊस सुरू असताना ज्ञानदेव ढोकणे या 45 वर्षीय इसमाच्या अंगावर त्यांच्या राहत्या घराचे छत कोसळल्याची घटना दि. 7 ऑक्टोबर रोजी घडली होती.
या घटनेत ज्ञानदेव ढोकणे हे गंभीर जखमी होऊन काल उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानदेव गजानन ढोकणे (वय 45) हे राहुरी तालुक्यातील उंबरे गावठाण येथे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे ज्ञानदेव ढोकणे यांच्या घराच्या छतामध्ये पाणी मुरले होते.
7 ऑक्टोबर रोजी दुपारच्या दरम्यान उंबरे येथे सुमारे दोन तास धुवाधार पाऊस झाला. पाऊस चालू असल्याने ज्ञानदेव ढोकणे यांच्यासह त्यांचा मुलगा घरातच होते. मुलगा दुसर्या खोलीत होता. तर ज्ञानदेव ढोकणे हे पाणी पिण्यासाठी आतल्या खोलीत गेले. त्याचवेळी अचानक घराचे छत कोसळून ज्ञानदेव ढोकणे यांच्या अंगावर पडले.
त्यावेळी ते ढिगार्याखाली दबले गेले. त्यावेळी त्यांच्या मुलाने धावत येऊन कसेबसे ढिगार्याखालून त्यांना बाहेर काढले. आणि नगर येथील रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापतीमुळे काल दुपारच्या दरम्यान त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ज्ञानदेव ढोकणे यांच्या अपघाती निधनाने उंबरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे ढोकणे कुटुंबावर मोठे संकट आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. शासनाने या कुटुंबाला घरकुल व शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.