
अहमदनगर- श्रीरामपूर बाजार समितीने सुरू केलेल्या सोयाबीनचा लूज (मोकळा) चा जाहीर लिलावाला शेतकर्यांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
काल बुधवार दि. 12 ऑक्टोबर 2022 रोजी 30 साधनांची लुज सोयबीन विक्रीस आली होती. त्याचे बाजारभाव 4611/- ते 4851/- रूपये असा निघालेला आहे.
सोयाबीनला खेडोपाडी व मार्केटमध्ये 4000/- ते 4100/- रूपये असा भाव मिळत होता. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं. लूज मार्केट चालू होण्याअगोदर श्रीरामपूर बाजार समितीने लूज (मोकळा) सोयबीनचे प्रथम जाहीर लिलाव काढण्यांत येतो त्यानंतर त्यांचे वजनमाप होऊन शेतकर्यांस तात्काळ विक्रीपट्टी अदा करण्यात येते.
या ठिकाणी शेतकर्यांच्या विक्रीपट्टी कोणतीही अनाधिकृत कपाती करण्यांत येत नाही. तसेच कोणत्याही प्रकारची सुट देण्यांत येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला सोयाबीन व मका बाजार समितीत विक्रीस आणावा.
खेडा खरेदी करीत असलेले व्यापारी शेतकर्यांना बाजारभाव व पैशाचे अमिष दाखवून वजनामध्ये सूट घेवून शेतकर्यांची मोठया प्रमाणात लूट करीत आहे. तरी यापासून शेतकर्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात येत आहे.