
अहमदनगर- संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणात आता पुन्हा आणखी 17 कर्जदारांच्या खात्यांची तपासणी कोतवाली पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, कोतवाली पोलिसांनी आणखी सात एजंटची नावे तपासात निष्पन्न केली आहेत. त्यातील एकास अटक करण्यात आली असून एकाचा मागील महिन्यातच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दाखल गुन्ह्यातील आरोपींची संख्या 23 वर पोहोचली आहे. चौघांना यापूर्वीच अटक केलेली आहे. तर आणखी सात एजंटची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत. त्यातील सचिन लहानबा जाधव (रा. निमगाव वाघा ता. नगर) याला अटक करण्यात आली आहे. अनिकेत सुनील आर्य (रा. नगर), तय्यब जैनुद्दीन सय्यद (रा. मुकुंदनगर), ज्ञानेश्वर चव्हाण (रा. केडगाव), दानिश अब्दुल रौफ शेख (रा. मुकुंदनगर), स्वप्निल लाहोर (रा. चितळेरोड) हे पाच जण पसार झाले आहेत. तर अक्षय जाधव (रा. सावेडी) याचाही गुन्ह्यात समावेश आढळला असून, मागील महिन्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान जाधव यांच्या नावावर पाच सोने तारण खाती आढळून आली आहेत. त्यात 32 तोळे बनावट दागिने सापडले असून त्याव्दारे 10 लाख 83 हजार रूपयांचे कर्ज घेण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासणीमध्ये समोर आले आहे. रात्री उशिरापर्यंत इतर कर्जदारांच्या खात्यांची तपासणी सुरू होती.