
अहमदनगर- संगमनेर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बापानेच आपल्या पोटच्या १५ वर्षे वयाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचारित मुलीच्या आजीमुळे हे प्रकरण उघडकीस आले.
पोलिसांनी त्या नराधम बापाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरात एक वृद्ध महिला राहते. तिच्या घरात बेरोजगार मुलगा व त्याची 15 वर्षीय मुलगी राहते. त्या महिलेची सून दहा वर्षांपूर्वीच घर सोडून निघून गेलेली आहे.
गेल्या सोमवारी दुपारच्या वेळी त्या महिलेची पंधरा वर्षीय नात पोटात दुखत असल्याने तिला त्रास होत होता. त्यामुळे महिलेने तिला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. घरी आल्यानंतर मुलीच्या आजीने तुझ्या पोटात का दुखत आहे, अशी विचारणा केली.
सहा महिन्यापूर्वी घरात कोणीही नसतांना बापाने आपल्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. मुलाने त्याच्या पोटच्या मुलीवर केलेला अत्याचार हा संपूर्ण प्रकार ऐकूण संतप्त झालेल्या या महिलेने नातीसह शहर पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सदर पिडीत मुलीच्या बापाविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376 (2) (आर) (एफ) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याचे कलम 4 व 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास पोलीस उननिरीक्षक निकिता महाले या करत आहे. बुधवारी सायंकाळी या नराधमास अटक करण्यात आली असून त्याला काल सकाळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.