अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील एका मूकबधीर विद्यालयातील सात वर्षीय दिव्यांग मुलीला अज्ञात इसमाने वाईट हेतूने स्पर्श करून तिच्या गुप्तांगावर कशानेतरी भाजल्याच्या जखमा करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हे प्रकरण दाबण्यासाठी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक चांगदेव खेमनर यांनी मुलीच्या नातेवाईकांवर दबाव आणल्याच्या आरोपावरून संगमनेेर पोलिसांनी मुख्याध्यापक खेमनर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या मामाने दिलेल्या फिर्यादी दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी एक भाची पीडित मुलगी ही जन्मतःच मूकबधिर आहे. सन 2020 मध्ये तिला शिक्षणाकरिता मूकबधिर विद्यालय येथे पाठविले होते. परंतु करोना काळ असल्याने तिला तिच्या आईवडिलांनी पुन्हा घरी आणले. पुन्हा जून 2022 मध्ये तिला शिक्षणाकरिता संबंधित मूकबधिर विद्यालय येथे पाठविले होते व ती तेथे शिक्षण घेऊन होस्टेलमध्ये एकटी राहत होती. दि.1 ऑक्टोबर रोजी मला माझी बहीण हिचा फोन आला. भाचीला जखमा झाल्या असून ती फार रडत आहे. तुम्ही तिला घेऊन जा, असे सांगितले.
त्यानंतर दि.2 ऑक्टोबर रोजी दुपारी बहिणीच्या घरी गेलो व भाचीला पाहिले असता तिच्या गुप्तांगावर आजूबाजुला जखमा दिसून आल्या. आम्ही तीन दिवसांपासून उपचार करत आहोत. परंतु त्यात काही फरक पडला नाही म्हणून तुम्ही तिला घरी घेऊन जा व तिला चांगल्या डॉक्टरांना दाखवा, असे मुकबधिर विद्यालयातील एका शिक्षिकेने सांगितले. म्हणून आम्ही तिला सोबत घरी घेऊन आलो व एका हॉस्पिटलमध्ये दाखवले. दि. 3 रोजी आम्ही उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी तिला तपासले व आम्ही त्यांना तपासल्याचे रिपोर्ट मागितले असता तेथील डॉक्टरांनी सांगितले तुम्ही पोलिसांत तक्रार द्या, आम्ही पोलिसांना रिपोर्ट देऊ, म्हणून आम्ही तिला घेऊन घरी आलो. दि.4 ऑक्टोबर रोजी आम्ही मुकबधिर विद्यालयात गेलो.
तेथे आम्ही मुख्याध्यापक चांगदेव खेमनर यांना भेटलो व त्यांना विचारले, जखमा कशामुळे झाल्या? तेव्हा खेमनर आम्हाला म्हटले की ती सारखी अंथरुणात लघुशंका करते. त्यामुळे त्या जखमा झाल्या असतील, तुम्ही प्रकरण वाढवू नका, आपण बसून मिटवून घेऊ, असे सांगितले. याबाबत तक्रार करण्यासाठी आम्ही संगमनेर शहर पोलीस स्टेशनला गेलो. तेथे पोलिसांना वरीलप्रमाणे घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांचे पत्र घेवून वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी येथे गेलो.
तिथे डॉक्टरांनी तपासून तिला पुढील उपचार व तिची तपासणीकरीता सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर येथे आलो.कोणीतरी अज्ञात इसमाने वाईट हेतुने तिला स्पर्श करुन तिच्या गुप्तांगाजवळ कशानेतरी भाजल्याच्या जखमा करुन दुखापत केली आहे व प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी मुख्याध्यापक चांगदेव खेमनर यांना विचारले असता त्यांनी तुम्ही हे प्रकरण वाढवू नका, आपण बसून मिटवून घेऊ, असे म्हणून आमच्यावर दबाव आणला.
या फिर्यादीवरून पोलिसांनी मुख्याध्यापक चांगदेव खेमनर यांच्याविरुद्ध. भादंवि. कलम 354, 324 सह 8, 10, 12 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.