
अहमदनगर- नोकरी आणि स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून यश सुरेश पाटील (पत्ता माहिती नाही) नामक व्यक्तीने एक नव्हे तर सात जणांना सहा लाखांना गंडा घातल्याची घटना घडली. सचिन सुरज बनकर (वय 36, रा. श्रीकृष्ण कॉलनी, केडगाव) यांच्या फिर्यादीवरून पाटील विरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश पाटील आणि फिर्यादी सचिन यांची एकमेकांसोबत ओळख झाली होती. यादरम्यान यश याने त्याचा भाऊ सिध्दीविनायक ट्रस्टमध्ये कामाला असून त्याठिकाण दान झालेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव असल्याचे सांगत 15 हजारांत एक तोळा सोने देण्याचे आमिष दाखवले. सचिन यांनी दोन तोळ्यासाठी त्याला 30 हजार रूपये दिले.
काही दिवसांनंतर यश याच्याकडे दागिन्यांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत दागिने दिले नाहीत. तसेच सचिन यांच्या मित्रांना नोकरीचे आमिष दाखवून अतुल भानुदास अंबटकर यांना दीड लाख, सुनील मधुकर राहिंज यांना एक लाख 40 हजार, योगिता सतिष बनकर यांना 70 हजार, प्रिती दीपक ठोंबरे यांना 70 हजार, सुरज अंबादास कसाव यांना 50 हजार आणि प्रशांत बाळू आहेर यांना 22 हजार 500 रूपये रूपयांना गंडवले. यश पाटीलविरूध्द फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.